सराफा व्यावसायिकांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. करोनामुळे सराफा व्यवसायाला देखील मोठे नुकसान सहन करावे लागले. तसेच वारंवार सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दरांमधील चढ-उतारांमुळे या क्षेत्रात कायमच अनिश्चिततेचे वातावरण असते.
यामुळे सराफा व्यावसायिकांनी देखील प्राप्तीकराच्या स्लॅबमध्ये दिलासादायक बदलांची मागणी केली आहे. प्रामुख्याने व्यावसायिकांची मागणी आहे की, प्राप्ती करातील स्लॅब रेट 10, 15 आणि 20 टक्क्यांच्या वर असू नये. तसेच अनेक नागरिक सोने, चांदी आणि हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करतात.
सध्या लॉंग टर्म कॅपिटल गेन वर 20 टक्के तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर 30 टक्के कर लावण्यात येतो. हा कर प्रत्येकी दहा टक्क्यांनी कमी करावा, अशी मागणी सराफा व्यावसायिकांकडून होत आहे. तसेच अनेक नागरिक शुभ प्रसंगी आर्थिक अडचणींमुळे क्रेडिट कार्डवर दागिने खरेदी करतात. क्रेडिट कार्डवर बॅंक चार्ज माफ करण्यात यावेत. विक्री कराप्रमाणे जीएसटी देखील एक टक्का करण्यात यावा.
सोन्या-चांदीच्या आयातीवर लावण्यात आलेल्या कस्टम ड्युटीमुळे या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. कस्टम ड्युटी देखील कमी करुन या व्यवसायाला हातभार लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सराफा व्यावसायिक अनेक दिवसांपासून कन्वेंशन सेंटर उभारण्याची मागणी देखील सातत्याने करत आहेत.
सरकारने सर्वप्रथम जीएसटी कमी करावा. तसेच प्राप्तीकरासाठी उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवरुन सात लाख करण्यात यावी. नागरिकांना गुंतवणूक करताना लाभ व्हावा यासाठी लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवरील करामध्येही कपात करण्यात यावी. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सराफा व्यावसायिकांची कन्वेशन सेंटर उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक ती कार्यवाही करावी, जेणे करुन सराफा व्यवसायास चालना मिळेल.
– दिलीप सोनिगरा, उपाध्यक्ष,
पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशन