मनपाकडून वाडिया पार्कमधील “ए’ अनधिकृत इमारत जमिनदोस्त
बेसमेंटचेही गाळे अनधिकृत : गाळे धारकांना न्याय?
नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशी वाडिया पार्क परिसरात अनधिकृत बांधण्यात आलेल्या “बी’ व “ए’ इमारतीवर मनपाचा बुडलोझर फिरला. त्यामुळे या कारवाईचे एकीकडे स्वागत होत आहे. मात्र, ठेकेदार, मनपाच्या वादात गाळेधारकांना लाखोंचा फटका बसला असून, आपली फसवणूक झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया गाळे धारकांमधून व्यक्त होत आहे.
तत्कालीन नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित केली होती. जिल्हा क्रीडा संकुल समितीने ही जागा विकसीत करण्यासाठी 1 लाख फुट जागा जवाहर मुथ्था या ठेकेदाराला दिली होती. मात्र, त्या ठेकेदाराने पार्क साठी ठेवलेल्या जागेत अनधिकृत “ए’ इमारतीत 19 हजार 43 चौरस फुट, व “बी’ इमारतीत 38 हजार 440 चौरस फुट अनधिकृत बांधकाम केले. मात्र, हे बांधकाम क्रीडा संकुल समितीच्या पार्क च्या जागेत अनधिकृत झाले असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत 2013 रोजी न्यायालयाने हे अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवार (दि.8) रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात या गाळ्यांवर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली. त्या कारवाईला ठेकेदाराने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अक्षेप घेवून ते अतिक्रमण कारवाई थांबविली. मात्र, शनिवार व रविवार (दि.15) रोजी सलग दुसऱ्या दिवशी दोन पोकलेनच्या सहाय्याने “ए’ इमारतीवर कारवाई केली.
तसेच क्रीडा संकुलात 152 गाळ्यांना परवानगी असून ठेकेदाराने 274 गाळे बांधले आहेत. तसेच तळघरात सुमारे 48 गाळे हे अनधिकृत असल्याचे समोर आले असून, अनेक गाळे विकले गेले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या ठेकेदाराने महापालिका, जिल्हा क्रीडा संकुलासह सर्वसामन्य नागरिकांची फसवणूक केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दीड वर्षापूर्वी महापालिकेचा प्रभारी आयुक्त पदभार होता. त्यावेळी द्विवेदी यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली होती. या भेटीत जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्त बांधकामाचा विषयही निघाला होता. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी व जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याशी चर्चाही केली होती.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेचा प्रभारी पदभार हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे येताच त्यांनी वाडिया पार्क मधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश इथापे यांनी कारवाईचे नियोजन करून, तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी, 30 कर्मचारी, 4 होमगार्ड यांचा चोख बंदोबस्तात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली. तसेच महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह रिजवान शेख, अर्जुन जाधव यांसह 30 ते 40 कर्मचारी, एक पोकलेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
अनेक गाळेधारकांचे स्वप्न भंगले
अनेकांनी व्यवसायासाठी कर्ज काढून गाळे खरेदी केले होते. तर काहींनी भाडे तत्त्वावर गाळे घेवून छोटा-मोठा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, या कारवाईने त्यांचे स्वप्नच भंगले. मनपाकडून सकाळी अनधिकृत इमारत पाडण्यास सुरुवात होताच अनेक गाळे धारकांची गाळ्यातील फर्निचर वाचविण्यासाठी धावपळ सुरु होती.
पोकलेनवर स्लॅब कोसळल्याने काम थांबले
महापालिकेने कारवाई लवकरात लवकर संपावी यासाठी दोन पोकलेन आणून ए व बी इमारतीवर कारवाई सुरु केली. मात्र, बी इमारतीचा स्लॅब पोकलेनवर कोसळल्याने हायड्रोलीक पाइप तुटल्याने ते नादुरुस्त झाले. त्यामुळे बी इमारत पाडण्याचे काम दिवसभर थांबले गेले.
ठेकेदारांकडून मनपा, क्रीडा संकुलासह गाळे धारकांची फसवणूक
क्रीडा संकुल विकसीत करण्याचे काम जवाहर मुथ्था यांनी घेतले होते. मात्र त्यांनी पार्कच्या जागेत अनाधिकृत बांधकाम केल्याने त्यांनी मनपाची तसेच क्रीडा संकुल समितीसह अनेक गाळे धारकांची फसवणूक केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पुनर्वसन झालेल्यांचीही फसवणूक?
वाडियापार्कचा विस्तार करण्यासाठी संबंधितांचे पुनर्वसन करून, त्यांना तीथेच विकसित जागा दिली जाईल असे सांगण्यात होते. गाळे पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना ठेकेदाराने बेसमेंटची गाळे दिली. मात्र हे गाळे देखील अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले असून, पुनर्वसन झालेल्यांचीही फसवणूक झाली आहे. “ए’ इमारत – 19 हजार 43 चौरस फूट, एम. आर. ट्रेड सेंटर (बी’ इमारत) – 38 हजार 440 चौरस फूट, संकुलाच्या तळघरातील गाळे – 48 हे अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे.