रांजणगाव गणपती – श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी मोफत खिचडी वाटप, पिण्याचं पाणी तसेच दर्शनासाठी योग्य व्यवस्था केलेली होती.
संकष्ट चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याने भाविकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळाला, असे अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर यांनी सांगितले. देवस्थानच्या वतीने दुपारी बारा वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
प्रगतशील शेतकरी नानाभाऊ पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बजाज इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. रांजणगाव यांच्या वतीने पर्यावरण जतन करण्याचा संदेश भाविकांना कापडी पिशव्या व झाडांची रोपे वाटप करून देण्यात आल्या.