ग्राहकोपयोगी वस्तूंच्या दरात घट होण्याची शक्‍यता

पुणे -केंद्र सरकारने कंपनी करात 10 ते 12 टक्‍के कपात केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा ग्राहक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या कंपन्या आपल्या काही उत्पादनांच्या दरात कपात करण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात येत आहे.

याबाबत ऐडलवाइस या आर्थिक विश्‍लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की, बऱ्याच कंपन्या मागणी नसल्यामुळे हैराण होत्या. आता ऐन सणासुदीच्या अगोदर केंद्र सरकारने कंपनी करात कपात केली आहे. त्यामुळे विक्री वाढावी यासाठी बऱ्याच कंपन्या आपल्या दरात काही प्रमाणात कपात करण्याची शक्‍यता आहे. या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी अवनीश रॉय म्हणाले, बिस्किटे, साबण, चहा इत्यादी क्षेत्रांतील कंपन्या आकडेमोड करू लागल्या आहेत.

कंपनी करात कपात केल्यामुळे ब्रिटानिया, एचयूएल, कोलगेट, आयटीसी इत्यादी कंपन्यांच्या दर कमी करायला बराच वाव मिळणार आहे. या कंपन्यांना आतापर्यंत 28 ते 35 टक्‍के इतका कंपनी कर द्यावा लागत होता. मात्र, डाबर सारख्या काही कंपन्यांच्या कंपनी करात फारसी कपात झालेली नाही. त्यांच्यावर अगोदरच 10 ते 16 टक्‍के इतका कंपनी कर होता. त्यामुळे अशाप्रकारच्या कंपन्यांना आपल्या उत्पादनांच्या दरात कपात करण्यास कमी वाव असणार आहे.

आमच्या ताळेबंदावर कंपनी करातील कपातीमुळे फारसा फरक पडलेला नाही, असे डाबर इंडिया या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी वनित मलिक यांनी सांगितले. मात्र, ग्रामीण भागात चांगला पाऊस पडला असल्यामुळे आणि कंपन्यांनी भांडवल पुरवठ्यासाठी हात सैल केल्यामुळे आम्ही सणासुदीच्या काळात विक्री वाढण्याबाबत आशावादी आहोत, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.