सभापतीपदाचा राहुल झावरेंनी दिला राजीनामा

आ. विजय औटींना धक्‍का; झावरे देणार लंके यांना पाठिंबा

पारनेर  – पारनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रोमांचक वळणावर आलेली असून पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल नंदकुमार झावरे यांनी पदाचा अचानक राजीनामा दिल्याने तालुक्‍यात एकच खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांमध्ये ते आमदार विजय औटी यांच्या विरोधात उभे ठाकताना दिसू शकतात, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

राहुल झावरे हे माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे चिरंजीव आहे. निवडणुकीत सभा किंवा प्रचारादरम्यान नंदकुमार झावरे, कै. बाळासाहेब विखे यांचा साधा उल्लेख झाला नाही. ही बाब आमच्या कुटुंबाला वेदनादायी ठरणारी आहे. यामुळे तालुक्‍यातील झावरे गट दुखावला गेला असून तालुक्‍यातील झावरे गटाचा इतिहास खोडण्याचा प्रयत्न होत आहे.

यापूर्वी आ. औटींना झावरे यांचे निवडणुकीत सहकार्य झाले असताना त्यांनी झावरे यांना डावलले आहे. कै. बाळासाहेब विखे यांचा देखील नावाचा कुठे उल्लेख होत नाही व त्यांचा फोटो प्रचारा दरम्यान दिसत नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून नंदकुमार झावरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे कुठेतरी मला वेदना होऊन माझ्या वडिलांचा व कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखला जात नसेल तर मला कोणाच्यातरी सहकार्याने पदावर राहणे मान्य नसल्याने मी राजीनामा दिला आहे असे राहुल झावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले, याआधीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी गरज होती. आता गरज शिल्लक नसल्याने त्यांचा साधा नामोल्लेख करणे देखील त्यांना गरजेचे वाटत नाही. ज्यांच्या मुखात नंदकुमार झावरे यांचे नाव नसेल यापुढे आमच्या मुखात देखील त्यांचे नाव नसेल अशी आमदार औटी यांचा नामोल्लेख न करता राहुल झावरे यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्‍यता असून औटींना बाजूला सारून झावरे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

तालुक्‍यांमध्ये दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे सरळ-सरळ त्यांना झावरे यांच्या भूमिकेचा फायदा लंके यांना होताना दिसत आहे. नंदकुमार झावरे यांनी अनेक वेळा आमदार विजय औटी यांना आपला पाठिंबा दिला. परंतु विधानसभेच्या मध्यावर त्यांनी घेतलेल्या औटी विरोधी भूमिकेमुळे त्याचा परिणाम तालुक्‍यातील मतदारावर निश्‍चित होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्याचा फटका औटी यांना होणार असून फायदा निश्‍चितच लंके यांचा होऊ शकतो येत्या काळामध्ये स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.