शहराच्या विकासासाठी पाचपुतेंची गरज : पोटे 

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्‍याच्या पाणी प्रश्‍नासाठी महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना आमदार केल्याशिवाय जनता राहणार नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी केले.
पाचपुते यांच्या प्रचारा निमित्त शहरातून काढलेल्या फेरीच्या वेळी नगराध्यक्ष पोटे बोलत होत्या. श्रीगोंदा बाजार समितीपासून सुरू झालेल्या पायी प्रचार फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

यावेळी नगराध्यक्षा पोटे म्हणाल्या, श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास व शहरातील विविध विकासकामांसाठी पाचपुते आमदार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला व शहराला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न केला. मागील काही गैरसमजुतीतून पाचपुते यांच्यापासून दूर राहावे लागले. पण आता पुन्हा शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपुते यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहोत.

पाचपुते व नागवडे हे दोन्ही तालुक्‍यातील नेते एकत्र आल्याने गटा-तटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता खरे तालुक्‍याचे विकासपर्व सुरू होणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्‍याच्या पाणी प्रश्‍नात नागवडे-पाचपुते एकत्र आल्यामुळे घोड, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी बबनराव पाचपुते, प्रतिभाताई पाचपुते, नगरसेविका मनीषा लांडे, वनिता क्षीरसागर, संगीता मखरे, सीमा गोरे, सुनीता खेतमाळीस, दीपाली औटी आदींसह महिला उपस्थित होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)