पिंपरी – वाल्हेकरवाडी, पेठ क्रमांक 30 येथील स्पाइन रस्त्यालगत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. संकुलातील दुकाने लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वाल्हेकरवाडी येथे पीएमआरडीएकडून 31 दुकाने बांधण्यात आली आहे. त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मार्च-2020 रोजी या व्यापारी संकुलाच्या उभारणीला सुरुवात झाली. हे काम पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांची मुदत होती.
त्यानुसार सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोविडमुळे मुदतीत काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. 142 ते 238 चौरस मीटरची ही दुकाने आहेत. भूखंडाचे एकूण क्षेत्र हे 1212 चौरस मीटर इतके आहे.
त्यामध्ये बिल्टअप एरिया हा 872 चौरस मीटर इतका आहे. व्यापारी संकुलाची इमारत ही दुमजली आहे. पीएमआरडीएने उभारलेल्या या व्यापारी संकुलातील दुकानांची लवकरच विक्री करण्यात येणार आहे.