पिंपरी – पश्चिम क्षितिजावर अवकाशामध्ये गुरु, शनी, शुक्र आणि चंद्र हे एका रेषेत आणि स्पष्टपणे दिसत आहेत. हे ग्रह एकत्रितपणे पाहण्याची संधी सायन्स पार्कमध्ये खगोलप्रेमींना उपलब्ध करुन दिली. त्याकरिता उत्तम दर्जाच्या दुर्बीणीतून हा दुर्मिळयोग खगोलप्रेमींना पाहता आला.
सायन्स पार्क नेहमीच खागोलप्रेमिंसाठी खगोल विश्वातील घडणाऱ्या घटनांची माहिती देत असतो. सध्या पश्चिम क्षितिजावर आकाशामध्ये गुरु, शनी, शुक्र आणि चंद्र हे एका रेषेत आणि स्पष्टपणे दिसत आहेत. साधारणपणे बुधवारी (दि.8) आणि गुरुवारी (दि.9) दोन दिवस ही स्थिती राहणार होती. खगोल प्रेमींना नेहमीच या ग्रहांविषयी आकर्षण राहिले आहे.
त्यामुळे बुधवारी (दि.8) सायंकाळी 6 ते 8 यावेळेत सायन्स पार्क येथे आकाशदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला खगोलप्रमींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
सुमारे 500 खगोल प्रेमी यावेळी उपस्थित होते. मात्र क्षमते अभावी यासाठी सुमारे 200 ते 300 नागरिकांना प्रवेश मिळाला नाही. या खगोलप्रेमींची निराशा टाळण्यासाठी गुरुवारी (दि.9) अवकाश दर्शनाची पुन्हा व्यवस्था करण्यात आली. यादवशी सुमारे 200खगोलप्रेमींनी अवकाश निरीक्षणाचा आनंद घेतला, अशी माहिती पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे शिक्षणाधिकारी सुनिल पोटे यांनी दिली.
आकाश दर्शना दरम्यान प्रेक्षकांनी गुरु व त्याचे उपग्रह ,शुक्र आणि चंद्राचे मनमोहक आणि ठळक रूप स्पष्ट पाहता आले. यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीचा वापर करण्यात आला. चंद्रावरील विवर आणि गुरूचे मनमोहक रूप व शनीच्या आकर्षक कडा पाहून विद्यार्थी, पालक हरखून गेले होते. विद्यार्थी आणि पालकांनी ही या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.