नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये गेले काही महीने लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यातच पाकव्याप्त काश्मिरमध्ये चीनने क्षेपणास्त्र डागण्याची यंत्रणा विकसित केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याभागातून काश्मिरवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची योजना चीनच्या लष्कराने आखल अिसावी असा अमदाज सामरिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
गेल्या काही काळापासून भारतासोबत कुरापती काढणाऱ्या चीनच्या या कारस्थानाचा उपग्रहांनी टीपलेल्या छायाचित्रांमुळे पर्दाफाश झाला आहे. चीन आणि पाकिस्तान हे शेजारी देश पाकव्याप्त काश्मीरमध्ये मिसाईल्स डागण्याची यंत्रणा विकसित करत असल्याची छायाचित्रे उपग्रहांनी टीपली आहेत. त्याबाबत अमेरिकन गुप्तचर खात्याने भारताला ही माहिती पुरवल्याचे लषकरातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
व्याप्त काश्मीरच्या देओलियन आणि जुरा या भागात चीन आणि पाक लष्कराच्या तुकड्यांना एकत्रितपणे पाहण्यात आले आहे. येथील लसाडना ढोकजवळच्या पाउली पीर येथे संबंधित क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याचे कारस्थान सुरू आहे. या साइटचा नियंत्रण कक्ष व्याप्त काश्मीरच्या मुख्यालयात असणार आहे. तेथे तीन अधिकाऱ्यांसह दहा चीनी सैनिक तैनात केले जाणार असल्याची माहितीही मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही यंत्रणा उभारण्यात येत असून जमिनीवरून आकाशात ाणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे येथून डागली जाऊ शकतात. भारताच्या ताफ्यात राफेल विमाने आल्यामुळे पाकिस्तानच्या छातीतही धडकी भरली आहे. त्यामुळे चीनने त्यांना हाहताशी धरून हे षडयंत्र रचले असल्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळात पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. त्यांचा संयुक्त अभ्यासही सुरू झाला असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. पाक आणि चीनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना एकत्रितपणे पाहिले गेल्याचेही सांगितले गेले होते.
भारतीय हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले होते. दोन्ही देशांच्या जवळकीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले होते. भारताला एकाच वेळी दोन आघाड्यांवर सज्जता ठेवावी लागत असून बऱ्याच काळापासून आपण या धोक्याच्या छायेत वावरत असल्याची टिप्पणीही त्यांनी केली होती.