सातारा -क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची नवी टीम रुग्णांच्या सेवेत हजर झाली आहे. ही नेमणूक राज्य शासनाने बंधपत्रित निर्धारीत केली असून “एनआरएचएम’अंतर्गत ही सेवा डॉक्टरांना बजवावी लागणार आहे.
सातारा कोविड हॉस्पिटल सुरु झाल्यापासून जिल्हा रुग्णालयाची मुख्य नियंत्रक म्हणून जवाबदारी वाढली आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 व कर्मचारी वर्ग दोन व तीन अशा 45 कर्मचाऱ्यांची सेवा कोविड सेंटरला वर्ग करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयात उपचार व सुविधांच्या यंत्रणेवर ताण पडू नये याची काळजी सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली आहे.
“एनआरएचएम’ अंतर्गत डॉ. आर. ए . केम्पे पाटील जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वर्ग एक म्हणून हजर झाले आहेत. नाशिकला जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे शस्त्रक्रिया विभागाची जवाबदारी देण्यात आली आहे. जगदाळे यांच्या सेवेचे नऊ महिने शिल्लक राहिले आहेत.
या अनुभवी डॉक्टरांच्या जोडीने सुधीर विठ्ठल करवंदे (भूलतज्ज्ञ), डॉ. प्रियव्रता पाणि (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. निखिल एकतपुरे (जनरल फिजिशियन), मायक्रोबॉयालॉजिस्ट अंकिता, डॉ. प्राजक्ता कोकरे व फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. एस एच सिद्दिकी हजर झाले आहेत. या डॉक्टरांना पदवी प्राप्त केल्यानंतर शासकीय सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने बंधपत्रित करण्यात आले असून कराराच्या अटी व शर्ती ठरवून देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांवर अपुऱ्या मनुष्यबळामुळे
कायमच मर्यादा पडत होत्या. जिल्हा रुग्णालयात तीन सुसज्ज अतिदक्षता विभाग सध्या सुरु असून तिसऱ्या अतिदक्षता विभागाचे मंगळवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दोन आयसीयू कोविड रुग्णांसाठी तर पहिला आयसीयू नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी त्या पद्धतीने नियोजन सुरु केले आहे. “एनआरएचएम’अंतर्गत हजर झालेल्या सर्व डॉक्टरांचा रुजू अहवाल डॉ. चव्हाण यांच्याकडे आला आहे. या मनुष्यबळाचा वैद्यकीय उपचारांसाठी योग्य प्रमाणात वापर करून घेतला जाईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.