बारामती (प्रतिनिधी): कटफळ ता. (बारामती) येथील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामती शहर व तालुक्याला दिलासा मिळाला आहे. कटफळ गावातील ६४७ कुटुंबातील ३२५४ नागरिकांचा आरोग्य विभागाच्या वतीने सर्वे करण्यात आला आहे.
तालुक्यातील कटफळ येथे ७९ वर्षीय वृद्धस कोरोनाची लागन झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील ५२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. रुग्णाच्या संपर्कातील तालुक्यातील २२ तर बारामती शहरातील ३० जणांची तपासणी करण्यात आली.
कटफळ येथील कोरोना संक्रमित रुग्ण मुंबई येथे कर्करोगाच्या उपचारासाठी दाखल झाला असता दिनांक (४ )मे रोजी तो कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर कटफळ गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. गावातील वाहतूक नियंत्रित करण्यात आली.
आरोग्य विभागाच्यावतीने केलेल्या सर्वेंत त्यांच्या संपर्कातील ५२ जणांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या सर्वांचे घरीच विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहर कोरोनामुक्त असून तालुक्यातील कटफळ येथील एक रुग्ण मुंबई येथे उपचार घेत आहे .असे असले तरीदेखील बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केल्या आहेत.