लखनौ – कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी महिलांचा स्वतंत्र जाहीरनामा आज प्रकाशित केला. त्यात महिलांवर आश्वासनाची खैरात करण्यात आली आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात महिलांसाठी स्कूटी, स्मार्ट फोन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, वर्षाला तीन सिलिंडर मोफत अशी आश्वासने देण्यात आली असून महिला उमेदवारांना विधानसभेच्या 40 टक्के जागा दिल्या जाणार आहेत.
या जाहीरनाम्याला शक्ती विधान असे नाव देण्यात आले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी तीन जणांची एक शासकीय समिती नेमली जाणार आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर 8 लाख महिलांना नोकरी दिली जाणार आहे.
मनरेगा योजनेतही महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. महिलांसाठी 10 क्रीडा अकादमी, तसेच रात्रशाळाही सुरू केल्या जाणार आहेत. महिलांमध्ये सक्षमता, शक्ती, दृढनिश्चय, हे सहज गुण असतात. तसेच महिला साहस आणि करुणा यांच्या प्रतीक असतात.
या महिला वर्गाच्या सशक्तीकरणाला अधिकाधिक वाव देण्याचाच प्रयत्न आम्ही यातून करणार आहोत, असे प्रियंका गांधी यांनी यावेळी नमूद केले. सध्या विधानसभेमध्ये महिलांना केवळ पंधरा टक्के प्रतिनिधित्व आहे. त्यांची संख्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.