Independence Day 2023 – देशभरामध्ये आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. शाळा, महाविद्यालये, सरकारी-खासगी कार्यालये, चौकाचौकात स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं हे सलग १०वं संबोधन ठरलं. या दैदिप्यमान सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मात्र आमंत्रितांपैकी एक रिकामी खुर्ची सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती.
ही खुर्ची होती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थिती न लावल्याने हा चर्चेचा विषय ठरला. खर्गे यांना, काँग्रेस मुख्यालयातील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असल्याने त्यांनी या सोहळ्यास उपस्थिती न लावल्याचे सांगण्यात येत आहे.
…म्हणून अनुपस्थिती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रातील मोदी सरकारचे हे अखेरचे वर्ष असून पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडुका होणार आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातून, विरोधकांवर टीकास्त्र डागले जाऊ शकते अशी अटकळ विरोधकांनी बांधली होती. यामुळेच काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी, या सोहळ्याला उपस्थिती लावली नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मोदींच्या भाषणात भ्रष्टाचार, घराणेशाही, द्वेषभावनेचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील संबोधनातून तीन वाईट प्रवृत्तींबाबत सांगितले. भष्ट्राचार हा पाहिली वाईट प्रवृत्ती असल्याचं सांगताना पंतप्रधानांनी आधीच्या सरकारांमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं. दुसरी वाईट प्रवृत्ती घराणेशाही असल्याचं सांगताना मोदींनी घराणेशाहीने देशाला पोखरून ठेवलं असल्याचं सांगितलं. द्वेषभावना तिसरी वाईट प्रवृत्ती असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी, या द्वेषभावनेनं देशाच्या मूलभूत विचाराला, देशाच्या सर्वसमावेशच चारित्र्याला डाग लावत उद्ध्वस्त करून ठेवलं असल्याचं म्हणाले.