नवी दिल्ली – चिनी व्हिसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना सीबीआय मुख्यालयात चौकशीदरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने कथित चिनी व्हिसा घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून 30 मे पर्यंत अंतरिम संरक्षण दिले आहे. म्हणजेच 30 मे पर्यंत चिदंबरला अटक होणार नाही. दरम्यान, सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी एकाही चिनी नागरिकाला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केलेली नाही. याआधी ते INX मीडिया प्रकरणात तुरुंगात गेले आहेत.
ईडीने बुधवारी दाखल केला गुन्हा –
2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा बनवण्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी यापूर्वी कार्ती आणि त्यांचे वडील माजी अर्थ आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले होते.
काय आहे प्रकरण –
2011 मध्ये कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या चिनी कंपनीच्या लोकांना कथितरित्या बेकायदेशीरपणे व्हिसा देण्यात आल्याचा आरोप आहे. कार्ती यांचा जवळचा सहकारी भास्कर रमण याच्यामार्फत या प्रकरणात लाचेची रक्कम स्विकारून गैरव्यवहार करण्यात आला होता. चिनी कंपनीच्या लोकांनी रमणच्या माध्यमातून कार्तीशी संपर्क साधला होता. या प्रकरणी सीबीआयने रमण यांना अटक केली आहे. तो सीबीआय कोठडीत आहे. कार्ती चिदंबरम यांनाही आज सीबीआयसमोर हजर व्हायचे होते, मात्र ते हजर झाले नाहीत.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काय आहे?
व्हिसा घोटाळा प्रकरण वेदांत समूह कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (TSPL) च्या उच्च अधिकाऱ्याने कार्ती आणि त्यांचा जवळचा सहकारी एस भास्कररमन यांना लाच दिल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. ही कंपनी पंजाबमध्ये वीज प्रकल्प उभारत होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्प उभारण्याचे काम एका चिनी कंपनीकडून केले जात होते आणि हे काम वेळेपेक्षा संथ गतीने सुरू होते.