नवी दिल्ली : देशाच्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक नेतेमंडळींच्या सभेचे ठिकठिकाणी आयोजन केले जात आहे. यावरून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष आपल्या निवडणूक प्रचारासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निधी गोळा करून कर्नाटक राज्याचा वापर एटीएम सारखा करत असल्याचा आरोप यावेळी जे पी नड्डा यांनी केला आहे.
कर्नाटकमधील तपास यंत्रणांनी केलेल्या छापेमारीमध्ये कर्नाटकातील काही ठेकेदारांच्या घरामध्ये 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडल्याचे नुकतेच उघड झाले आहे. हे प्रकरण अत्यंत लाजिरवाणे असून मतदारांशी केलेली क्रूर थट्टा असल्याचे नड्डा यांनी म्हंटले आहे. याबाबत जे पी नड्डा यांनी एक्स अर्थात ट्वीट करत लिहिले की, “कर्नाटकातील काही कंत्राटदारांच्या घरात 100 कोटींहून अधिक रुपयांची रोकड सापडल्याचे नुकतेच उघड झाले असून, ही अत्यंत लाजिरवाणी आणि मतदारांची घृणास्पद चेष्टा आहे. मात्र, काँग्रेसच्या भ्रष्ट डीएनएचा हा एक छोटासा नमुना आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिलेले तेच कंत्राटदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध खोटे बोलण्यात सक्रिय होते.”
“आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सरकारने मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार आणि पैसे गोळा करण्यासाठी एटीएम बनवले हे कर्नाटकचे दुर्दैव आहे. साहजिकच भ्रष्टाचाराची हमी काँग्रेस देऊ शकते. काँग्रेस आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस सरकारांनी छत्तीसगड आणि राजस्थानला भ्रष्टाचाराचे एटीएम बनवले आहे आणि तेलंगणा आणि मध्य प्रदेश सारखीच एटीएम बनवून जनतेच्या कष्टाचे पैसे लुटायचे आहेत. त्यामुळे गरिबांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी पैसा लुटता यावा यासाठी मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये सत्तेत येण्याचे स्वप्न काँग्रेस पाहत आहे. काँग्रेस फक्त लुटीची हमी देऊ शकते”, असे ट्वीट करत जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
जे.पी.नड्डा यांचे ट्वीट
कांग्रेस पार्टी को वादे करने की कला में महारत हासिल है और अब यह पार्टी एक कदम आगे बढ़कर वादों के बदले में गारंटी देने लगी है।
कर्नाटक में कतिपय ठेकेदारों के घरों से हाल ही में 100 करोड़ से अधिक की नकदी मिलने का खुलासा हुआ है जो बेहद शर्मनाक व मतदाता के साथ घिनौना मजाक है।… pic.twitter.com/0IpZCxnibL— Jagat Prakash Nadda (@JPNadda) October 16, 2023
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये भाजप, काँग्रेससह भारत राष्ट्र समिती पक्ष देखील प्रबळ दावेदार असणार आहे. यावरूनच आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.