नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काल पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त एका प्रमुख वृत्तवाहिनीने प्रसारीत केले आहे. तथापि, आज पत्रकारांशी बोलताना मात्र येडियुरप्पा यांनी राजीनामा देऊ केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
येडियुरप्पा हे आपल्या मुलासह दिल्लीत आले असून त्यांनी गेले दोन दिवस भाजपच्या सर्व वरिष्ट नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काल मोदींशी झालेल्या चर्चेत त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करून राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे. पण असे काही झाले असल्याच्या वृत्ताचा त्यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना इन्कार केला.
कर्नाटकात येडियुरप्पांच्या विरोधात भाजपमध्ये मोठी बंडाळी माजली असून त्या संबंधात काल येडियुरप्पा हे एका विशेष विमानाने दिल्लीत दाखल झाले. मोदींशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी दोन ट्विट प्रसारीत केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या सर्व वरिष्ठांशी मी चर्चा केली.
यावेळी कर्नाटकातील राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. पंतप्रधानांचे माझ्याविषयी चांगले मत आहे. कर्नाटकच्या आगामी निवडणुका जिंकण्याच्या संबंधात अधिक तयारी करण्याची सूचना आपल्याला देण्यात आल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात नमूद केले आहे.
कर्नाटकातील अनेक मंत्री व भाजप आमदारांनी येडियुरप्पांवर जाहीर टीका केली असून सरकारच्या कारभारात येडियुरप्पा यांचे चिरंजीव विजयेंद्र हे सतत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.