पवारांची मोदींशी तासभर चर्चा; चर्चेच्या तपशिलाविषयी तर्कविर्तक

नवी दिल्ली  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेचा फोटो पंतप्रधान कार्यालयानेच शेअर केला आहे. मात्र, त्याचा कोणताही तपशील पंतप्रधान कार्यालयाने दिलेला नाही. मोदींशी आपली राष्ट्रीय हिताच्या विविध बाबींवर चर्चा झाली, असे पवारांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.

येत्या सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवरही या भेटीला महत्त्व असून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवरही या भेटीला महत्त्व दिले जात आहे. शुक्रवारीच राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पवारांशी चर्चा केली आहे. चीनच्या सीमेवर सध्या विविध घडामोडी सुरू असून त्या संबंधात संरक्षणमंत्र्यांनी माजी संरक्षणमंत्री या नात्याने पवारांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते तर सरकारकडून विविध राजकीय पक्षांशी समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून पियुष गोयल यांनी पवारांशी चर्चा केल्याचे सांगितले गेले आहे.

प्रदेश राष्ट्रवादी अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, पवारांनी मोदींशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली याची आपल्याला कल्पना नसली तरी पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या चर्चेच्यावेळी आपण त्यांच्याशी राज्यातील सहकार क्षेत्रातील स्थितीवरही चर्चा करणार आहोत, असे त्यांनी मला सांगितले होते असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सहकारी बॅंकिंग क्षेत्राविषयी पवारांनी मोदींना अलीकडेच काही पत्रेही पाठवली होती. केंद्र सरकारने केंद्रात एक नवीन सहकार खाते अलीकडेच सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवरही पवारांनी मोदींशी चर्चा केली असण्याची शक्‍यता आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.