नवी दिल्ली: वाचण्याचे आणि शिकण्याचे कोणतेही वय नाही; आणि माणूस कोणत्याही वयात आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे एका 93 वर्षाच्या विद्यार्थ्याने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
सी.आय शिवसुब्रमण्यन, असे या 93 वर्षाच्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून (इग्नू) पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. इग्नूच्या विद्यापीठाच्या झालेल्या दीक्षांत समारंभात ते सगळ्यात वयस्क विद्यार्थी होते.
शिवसुब्रमण्यम हे त्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे; जे म्हातारपणाची चिंता न करता आपली स्वप्न पूर्ण करण्यात मग्न असतात. त्याच्या या कामगिरीबद्दल मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शिवसुब्रमण्यम म्हणतात, “कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मला अभ्यास करता आला नाही. पण वयाच्या 87 व्या वर्षी अखेर मला शिक्षणाची संधी मिळाली.” शिवसुब्रमण्यन म्हणाले, “1940 च्या दशकात शाळा संपल्यानंतर मला महाविद्यालयात जायचे होते; त्याचवेळी माझे आईवडील आजारी पडले. तेव्हा नातेवाईकांनी मला नोकरी करण्याचा सल्ला दिला.
”त्यानंतर मी दिल्लीला आलो. येथे मला वाणिज्य मंत्रालयात कारकुनाची नोकरी मिळाली. त्यानंतर 1986 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी ते संचालक म्हणून निवृत्त झाले. पण त्याचे पदवीधर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
शिवसुब्रमण्यम म्हणतात, “मला संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी देण्यात आली होती, परंतु मी पदवीधर नव्हतो, म्हणून मी जाऊ शकला नाही.” एक दिवस माझ्या फिजिओथेरपिस्टने सांगितले की, मला इग्नूतील एका कोर्स साठी लवकर जायचे आहे. तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी एखादा कोर्स आहे का? अशी चौकशी करण्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीतून इग्नूमध्ये वयाची कोणतीही अट नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मी पदवीसाठी सार्वजनिक प्रशासन विषयाला प्रवेश घेतला. पदवी पूर्ण झाल्यानंतर मी पदव्युत्तरला प्रवेश घेतला.
गेल्या सहा वर्षांत, ते सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करत होते. पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर त्यांचा एमफिल करण्याची इच्छा होती. परंतु एमफिलला जागा खूपच कमी असल्यामुळे प्रेवेश घेतला नाही.