- मावळते आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे गैरहजर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि. 18) सायंकाळी पाचच्या सुमारास आयुक्त व प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, रविकिरण घोडके, वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे आदी अधिकारी उपस्थित होते.
काल दिवसभरा सिंह यांची वाट पाहत थांबलेले मावळते आयुक्त राजेश पाटील आज मात्र अनुपस्थित होते. तसेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे देखील यावेळी हजर नव्हते. हे दोन्ही उच्च अधिकारी मुंबईला गेले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांच्या अनुपस्थितीची महापालिका वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 मध्ये नियुक्ती झाली होती. पाटील यांची दीड वर्षांत राज्य सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी दिवसभर आयुक्तांसह सर्वच अधिकारी शेखर सिंह यांची वाट पाहत अगदी सायंकाळी उशिरापर्यंत सर्वजण वाट पाहत होते. परंतु शेखर सिंह आले नव्हते. गुरुवारी सायंकाळी येऊन त्यांनी पदभार स्वीकारला.
शेखर सिंह यांचा परिचय
शेखर सिंह हे 2012 च्या बॅचचे अधिकारी आहेत. देश पातळीवर त्यांचा 306 वा क्रमांक होता. सिंह हे आयआयटी गुवाहटीचे (इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी) पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बर्केली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून स्ट्रॅक्चरल इंजिनिअरिंग शाखेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
नागपूरचे सहायक जिल्हाधिकारी, रामटेकचे प्रांताधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सिंह यांनी काम पाहिले आहे. सातारा जिल्हाधिकारीपदाचा त्यांचा बराचसा कार्यकाळ करोनामध्ये गेला आहे. त्यांनी करोना महामारीच्या कार्यकाळात चांगले काम केले आहे.