मॉस्को – रशियामध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न आता पुन्हा सुरू केले गेले आहेत. जर एखाद्या महिलेने 10 अपत्यांना जन्म दिला तर 10 लाख रुबल इतके बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा पुतीन यांनी केली आहे. “मदर हिरोईन’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेसाठी 10 किंवा अधिक अपत्ये असलेल्या महिलेला मोठ्या बक्षिसाबरोबर सामाजिक प्रतिष्ठाही दिली जाणार आहे.
तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या काळात म्हणजे 1944 मध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी कुटुंबांना आर्थिक मोबदल्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. त्या योजनेला रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी पुनरुज्जीवित केले आहे. रशियाचे तत्कालीन अध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांनी वंशवाढीसाठीचा हा पुरस्कार तब्बल 4 लाख नागरिकांना दिल्याचीही नोंद आहे. दहा लाख रुबलचे बक्षीस दहाव्या अपत्याच्या जन्मानंतर दिले जात होते. मात्र अन्य 9 अपत्ये त्यावेळी जिवंत असणे अनिवार्य होते.
रशियाने युक्रेनबरोबर युद्ध छेडल्यापासून रशियाची अपरिमित मनुष्यहानी झाली आहे. युक्रेनमध्ये रशियाचे किमान 15 हजार सैनिक मारले गेले आहेत. तर 45 हजारांपेक्षा अधिक जखमी झाले आहेत, असा अंदाज “सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्स यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय करोनाच्या साथीमध्ये रशियात आतापर्यंत 3 लाख 83 हजार मृत्यू झाले आहेत.