पिंपरी – व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. त्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी आहेत. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक, वडापावच्या गाड्या आणि खानावळीमध्ये घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मंगळवारी सकाळी चिंचवडगावातील जैन शाळेजवळ असलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये घरगुती वापराच्या गॅसचा स्फोट होऊन त्यात दोनजण जखमी झाले. यावेळी अग्निशामक दलाने या ठिकाणाहून तीन व्यावसायिक आणि तीन घरगुती वापराचे सिलिंडर बाहेर काढले. या ठिकाणीही आठ सिलिंडर आढळून आले. त्यापैकी बहुतांश सिलिंडर हे घरगुती वापराचे होते. मात्र या घटनेवरून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापर होत असल्याचे उघडकीस आले. बहुतांश स्नॅक्स सेंटर, हॉटेल, वडापावच्या गाड्या आणि घरगुती खाणावळीमध्येही घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे दिसून येईल.
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होण्याचे सर्वात महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती होय. सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे वजन 14.2 इतके असून त्यांची किंमत 949.50 इतकी आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत तब्बल दोन हजार 205 रुपये इतकी आहे. घरगुती गॅस प्रतिकिलो 66.86 रुपये पडतो. पण व्यावसायिक गॅसचा दर 116 रुपये प्रतिकिलो पडतो. व्यावसायिक गॅसच्या तुलनेत घरगुती गॅसची दर तब्बल निम्मा इतका आहे. पदार्थांचा दर वाढविल्यास ग्राहक संख्येवर त्याचा परिणाम होत आहे. तसेच जादा नफा कमविण्यासाठी व्यावसायिक घरगुती वापराचा सिलेंडर व्यावसायाकरिता वापरतात.
असा होतो गॅस सिलिंडरचा काळाबाजार
वितरक, ग्राहक आणि डिलिव्हरी करणारे कर्मचारी हे तीन स्त्रोत गॅसचा काळाबाजार करणारे आहेत. काहीजण थेट वितरकाशी संपर्क करून गॅस सिलिंडरच्या दरापेक्षा 200 रुपये अधिक देऊन घरगुती गॅसचा काळाबाजार करतात. तर काही प्रकरणामध्ये एका कुटुंबात विविध सदस्यांच्या नावावर तीन-चार कनेक्शन असतात. असे ग्राहक आपल्या नावावरील गॅस सिलिंडर व्यावसायिकांना चढ्या भावाने विकतात. तर काही गॅस एजन्सीचे कर्मचारी परस्पर गॅस व्यावसायिकाना पुरवितात.
=====================