पाटणा – अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर आता बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात माता सीतेचे एक मोठे मंदिर उभारण्याची योजना साकारते आहे. सीतेचा जन्म सीतामढी येथे झाला होता अशी मान्यता आहे. मंदिराच्या उभारणीसाठी सीतामढी परिसरातील ५० एकर जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कामेश्वर चौपाल म्हणाले जशी रामासाठी अयोध्या आहे तशीच सीतेसाठी सीतामढी आहे. हिंदूंसाठी ही पवित्र भूमी आहे. अयोध्येत आता जगभरातील लोक दर्शनासाठी येतील तेंव्हा त्यांना माता सीतेचे जन्मस्थळ पाहण्याचीही इच्छा असेल. सीतेच्या प्रतिष्ठेनुरूप मंदिराची उभारणी व्हावी अशी आमची इच्छा आहे.
चौपाल या मंदिराची मागणी अनेक वर्षांपासून करत आले आहेत. १९८९ मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या शीलान्यासादरम्यान चौपाल यांनीच पहिली वीट रचली होती. आता ते अयोध्येतील राम मंदिराचे ट्रस्टीही आहेत. ते म्हणतात जवळपास शंभर वर्षांपूर्वी बनवण्यात आलेले एक मंदिर सीतामढीत आहे. मात्र त्या मंदिराची अवस्था आता फारशी चांगली नाही. त्यामुळे येथे नव्या मंदिराची उभारणी व्हावी आणि ते अयोध्येतील राम मंदिराएवढेच भव्य असावे अशी आमची इच्छा आहे.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रधान सचिव डॉ. एस. सिध्दार्थ म्हणाले की सरकार कोणते मंदिर उभारू शकत नाही. मात्र मंदिराची उभारणी करण्याची मागणी सातत्याने केली जाते आहे व त्यामुळेच सरकारने जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर झाल्यावर येथे मोठ्या संख्येने भाविक येतील. त्यांना राहण्याची व अन्य सुविधा पुरवण्याची गरज भासेल.
भविष्यातील गरजांचा विचार करूनच या क्षेत्राचा विकास केला जाईल. राम मंदिराच्या निर्मितीनंतर या भागाबद्दलही लोकांचे कुतुहल वाढले आहे. तिरूपती येथे करण्यात आला तसा विकास करण्याची येथे क्षमता आहे. त्याकरता पुरेशी जागा उपलब्ध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.