वडूज – मायणी, ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळ बदलाचा वाद कोल्हापूर येथील धर्मादाय उपायुक्तांसमोर न्यायप्रविष्ट असताना, साताऱ्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकाची नोटीस असलेली बनावट प्रत छापल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे व तीन जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आ. जयकुमार गोरे, सौ. सोनिया गोरे, शैलजा साळुंखे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी मंजूर केले आहेत.
याबाबत माहिती अशी, आ. गोरे, सौ. सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा अशोक साळुंखे, स्मिता वीरेंद्र कदम व महम्मद फारुख खान यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद व खजिनदार आप्पासाहेब देशमुख यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आ. जयकुमार गोरे, अरुण गोरे यांनी बेकायदेशीर ठराव करून छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीवर संचालक मंडळ अस्तित्वात आणले आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर येथे धर्मादाय उपायुक्तांसमोर दावा सुरू आहे.
मायणी येथे संस्थेच्या काही स्थावर मिळकतींची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने आणि सभासदांना काही कळू नये, या हेतूने या मालमत्तेसंदर्भातील जाहीर नोटीस साताऱ्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकात प्रसिद्ध केली होती. तो अंक कोल्हापूर येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात दाखल करण्यात आला होता; परंतु त्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या मूळ दैनिकात ती नोटीस प्रसिद्ध झाली नव्हती. त्यामुळे त्या दैनिकाच्या संपादकांना विचारले असता, तो अंक आम्ही छापला नसल्याचा लेखी खुलासा त्यांनी दिला होता. त्यामुळे त्या दैनिकाचा बनावट अंक छापण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यातून संस्थेच्या सभासदांची व संस्थेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आ. गोरे, सोनिया गोरे व शैलजा साळुंखे वडूज न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने 9 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण यापूर्वीच दिले आहे. त्या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावर 9 जूनला निर्णय होणार आहे.