कराड -कराड तालुक्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेले मलकापूर शहर नुकतेच करोनामुक्त झाले आहे. त्यानिमित्ताने आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूरची पाहणी करून अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे करोनाचा अथवा साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात वनवासीमाचीनंतर मलकापूर हे करोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. मलकापुरातील अहिल्यानगर, विश्रामनगर व आगाशिवनगर भागात करोनाचे रूग्ण आढळले होते. या विभागातील करोना रूग्णांची संख्या 26 इतकी झाली होती. मलकापूर नगरपालिका प्रशासन, तालुका आरोग्य विभाग, प्रांत व तहसील कार्यालयाकडून योग्य नियोजन केले होते. त्यामुळे मलकापूर करोनामुक्त झाले.
काही सूज्ञ मंडळी मलकापूर नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागाबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब खेदजनक आहे. मलकापूर नगरपरिषद कोव्हिड-19 कामाबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. मलकापूरमध्ये करोनाबाधित कोणाच्या गलथान कारभारामुळे झाले यांचे मूळ शोधावे लागेल, असा इशारा उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिला आहे.
ते म्हणाले, मलकापूरचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे करोनामुक्त झाले आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी करोना प्रादुर्भाव कालावधित आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र शहर स्वच्छतेसाठी काम केले. दैनंदिन कचरा गोळा करणे, रस्ते सफाई, गटर काढणे, वाहतूक करण्याचे काम केले आहे. तसेच शहरामध्ये तीनवेळा औषध फवारणी करण्यात येत होती. चोवीस बाय सात नळ पाणीपुरवठा योजना व सांडपाणी प्रक्रिया योजना कार्यान्वित ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित ठेवण्यात येत होती.
तरीही काहीजण मलकापूर पालिकेची बदनामी करत आहेत. तालुक्यातील जी गावे बाधित झाली ती कशामुळे व कोणामुळे झाली याची माहिती प्रशासनाकडे आहे. तेरा गावे प्रतिबंधित झोन म्हणून घोषित करावी लागली. यामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करावी लागेल. मलकापूर नगरपालिकडे एक बोट कराल तेव्हा स्वत:कडे चार बोटे येतील याचा विसर भाजप पदाधिकारी व इतरांना पडलेला आहे. सदरचा खुलासा नागरिकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून करत असल्याचे त्यांनी सांगितले.