पुणे – तुम्हाला झालेली सर्दी अथवा खोकला हा करोनाचे लक्षण आहे की अन्य कोणत्या आजाराचे याचे घरबसल्या विश्लेषण करता येणार आहे. पुण्यातील प्रगत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेतर्फे (डीआयएटी) कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल यंत्रणा विकसित केली आहे.
सर्वसामान्यपणे करोना निदानासाठी घसा आणि नाकातील द्रवाचे नमुने तपासले जातात. मात्र, अनेकदा विषाणू संसर्ग आहे का अन्य आजार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत शंका दूर करण्यासाठी डीआयएटीतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित एक डिजिटल यंत्रणा विकसित केली आहे.
संबंधित व्यक्तीला आपल्या छातीचा एक्स-रे डिजिटल स्वरुपात या यंत्रणेवर अपलोड करावा लागेल. या एक्स-रेच्या आधारावर ही यंत्रणा छातीत नेमकी काय समस्या आहे, याचे विश्लेषण करते. तसेच ही समस्या म्हणजे करोना संसर्ग आहे की नाही याबाबतही माहिती देते. यामाध्यमातून रेडिओलॉजिस्टना समस्याचे विश्लेषण करून त्यानुसार औषधे सूचविणे सूलभ होईल, अशी अपेक्षा संस्थेतर्फे व्यक्त केली. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील अधिक माहिती उपलब्ध आहे.