श्रीगोंदा – सहकाराच्या जडणघडणीत महाराष्ट्र अग्रभागी होता. सहकारी पतसंस्था आणि गावोगावच्या विकास सोसायट्या ग्रामीण अर्थकारणात महत्वपूर्ण असल्याचे सांगत सहकारी संस्था या सामान्यांची ताकद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
काष्टी येथील “महेश्वर मल्टीस्टेट’च्या महेश्वर संकुलाचे उद्घाटन खा. पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी घनश्याम शेलार होते. आ. बबनराव पाचपुते, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, आ. अशोक पवार, आ. नीलेश लंके, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार दादा कळमकर, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, नगर जिल्ह्यातील मंडळींनी सहकार रुजविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. जिल्हा सहकारी साखर कारखानदारीत अग्रेसर आहे.
सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचे हित जोपासणे सोपे होते. त्यामुळे सहकारात राजकारण आणू नये. नोटबंदी आणि जीएसटीने सहकार क्षेत्रासमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. “महेश्वर मल्टीस्टेट’चे अध्यक्ष दत्तात्रय गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रातून येऊनही सहकार आणि बॅंकिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. महेश्वर समूहाच्या माध्यमातून सहकाराची तत्वे रुजविण्याचे काम झाले आहे, असे गौरवोद्गार खा. पवार यांनी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम शेलार म्हणाले, सहकारी पतपेढ्यांमुळे छोट्या व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ मिळाले. महेश्वर समूहाची गेल्या अकरा वर्षांतील वाटचाल प्रेरणादायी आहे. राज्यासह देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम खा. पवार यांनी केले आहे. श्रीगोंद्यावर त्यांचे नेहमीच प्रेम राहिले आहे. आ. बबनराव पाचपुते, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची भाषणे झाली. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले तर “महेश्वर’चे अध्यक्ष दत्तात्रय गावडे यांनी आभार मानले.