पाथर्डी -शिवसेना पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करू नका. नव्या जोमाने नव्या उमेदीने पक्ष वाढीसाठी काम करा. पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करून तळागाळातील शिवसैनिकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा पक्षाची ताकद राज्यात कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
पाथर्डी तालुका शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तालुक्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची माहिती ठाकरे यांना दिली. यावेळी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे विक्रम राठोड, सुनील तांबे उपस्थित होते.
यावेळी दक्षिणेतील शेवगाव, पाथर्डी व कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील दहा हजार शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. नगर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठनेते अशोक गायकवाड यांचा मातोश्रीवर शिवसेनेमध्ये प्रवेश झाला.