पुणे – पर्यावरणपूरक इंधन म्हणून वापरले जाणारे “सीएनजी’ अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरात शनिवारी मध्यरात्री प्रतिकिलो 2.80 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील सीएनजीचा नवीन दर 80 रुपयांवर गेला आहे. या दरवाढीचा फटका रिक्षाचालक तसेच शालेय वाहतूक करणाऱ्या सीएनजीवरील वाहनांना बसत आहे. त्याचा अंतिम भार पुन्हा सर्वसामान्यांवरच येणार आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत सीएनजीचे भाव सुमारे 30 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत.
पेट्रोल आणि डीझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या दोन्हींच्या तुलनेत पर्यायाने स्वस्त असलेल्या सीएनजीकडे नागरिकांचा ओढा वाढला होता. यामुळे प्रवासी सीएनजी वाहनांची मागणीही वाढली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे कंपन्यांकडून ही दरवाढ केली जात असून या सुधारित दरवाढीनंतर पुण्यात आता सीएनजी 80 रुपये किलोवर पोहचला आहे.
रिक्षा-व्हॅनचालकांची अडचण
पर्यावरण संवर्धनासाठी रिक्षांना सीएनजी बंधनकारक आहे. पुण्यातील बहुतांश रिक्षा सीएनजीवर आहेत. तसेच शेकडो स्कूल व्हॅनही सीएनजीवर चालतात. मात्र, या सततच्या दरवाढीने रिक्षा चालक तसेच व्हॅन चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. करोनाचे सावट संपल्यानंतर काही महिन्यांसाठी शाळा सुरू झाल्या होत्या. या वेळी शालेय वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून काही प्रमाणात दर वाढविले होते. मात्र, आता सीएनजीची दरवाढ थांबण्यास तयार नसल्याने पुढील महिन्यात हे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, त्याचा फटका पालकांना बसणार आहे.