पुसेगाव -पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या काळात डेंग्यू, चिकन गुनिया व मलेरिया यासारखे आजार डासांमुळे उदभवतात व पसरतात. डासांना पळवून लावण्यासाठी लोकांमधून अनेक उपाययोजना होत असल्याचे दिसून येत आहे.
आजारांपासून लांब राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे डासांना घरात येऊ न देणे. त्यासाठी क्वॉंइल, मॅंट, रिपेलेंटस किंवा लिक्विड आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वसन विकाराचा त्रास होतो. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय करण्यातडे ओढा आहे.
तुळस, पुदिना, झेंडू आदी आपल्या अंगणात लावल्यास डासांपासून मुक्ती मिळते, असे जाणकारांचे मत आहे. खोबरेल तेल व कडूनिंबाचे तेल एकत्र करून लावणे, लिंबाचं आणि निलगिरी तेलाचे मिश्रण अंगावर लावणे, कापूर जाळणे, कडूनिंबाचे तेल व कापूर यांचे मिश्रण करून फवारणे, लसणाच्या पाकळ्या पाण्यात टाकून चांगल्या उकळल्यावर हे पाणी घरात शिंपडणे, तेलात ओव्याची पूड मिसळून दिवा लावणे, अशा प्रकारचे घरगुती उपाय घरोघरी सुरू झाले आहेत.
कडूनिंब, झेंडू, सिद्रोनला ग्रास, ओडोमास ट्री, पेटुनिया, लव्हेंडर, लेमन ग्रास, रोजमेरी, तुळस या वनस्पतींना विशिष्ट प्रकारचा वास असतो. या वनस्पती आपण अंगणात अथवा बाल्कनीत लावू शकतो. त्यामुळे इतर उपायांपेक्षा या घरगुती कमी खर्च आणि आरोग्यदायी उपचाराला प्राधान्य क्रम दिला जात असल्याचे सदृश्य चित्र पहावयास मिळत आहे. या कारणाने या रोपांची लागवडीचे प्रमाण प्रामुख्याने वाढले आहे.
काही वनस्पतींच्या पानांचा, तेलांचा अथवा सुगंधाचा वापर झाल्यास डास मानवाजवळ येत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने तुळस, कडूनिंब, निरगुडी, झेंडू आदी वनस्पतींची लागवड आरोग्याला पोषक वातावरण तयार करते. तसेच गप्पी मासे यांचे प्रमुख अन्न डासांची अंडी असल्याने त्या डासांची उत्पत्ती होत नाही. वनस्पतींसह गप्पी मासे या डासांवर तात्पुरते उपाय आहेत, असे वनस्पतीशास्त्र अभ्यासक प्रा. सोहन मोहळकर यांनी सांगितले.
घरचा ओला कचरा वेगळा करून त्यापासून चांगल्या प्रतीचे खत तयार करता येते. त्याचा उपयोग गच्चीवरील बाग व परसबागेतील औषधी वनस्पतींसाठी केला जाऊ शकतो. प्रत्येक कुटुंबाने किमान पाच औषधी तुळस, पुदिना, गवती चहा, गुळवेल, शतावरी, निर्गुडी, खाऊचे पान आदी वनस्पती लावाव्यात.
– डॉ. कुंडलिक मांडवे(अध्यक्ष,प्रयास सामाजिक संस्था,वडूज)