पिंपरी -राज्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबईनंतर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सर्वांत जास्त ओमायक्रॉनचे 26 रुग्ण आढळून आले. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. तर जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांनाही सौम्य लक्षणे आहेत.
एकाही रुग्णाला आयसीयू किंवा व्हेंटीलेटरची गरज पडलेली नाही. आतापर्यंत परदेशातून आलेल्या 14 आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क करताना काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने आपल्याकडील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या असून त्यांची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मार्फत
करण्यात येत आहे.
1495 पैकी केवळ 14 नागरिकांना ओमायक्रॉन
सध्या शहरात परदेशातून आलेल्या व त्यांच्या सहवासात आलेल्या 1591 नागरिकांची ओमायक्रॉनची तपासणी करण्यात आली. त्यातील शुक्रवारपर्यंत (दि. 30) 1495 नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 32 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परंतु त्यातील केवळ 14 रुग्ण ओमायक्रॉनचे असून उर्वरीत रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आहेत.
तर संपर्कातील 28 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत. तर रॅण्डम तपासणीत ओमायक्रॉनच्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे मिळून शहरात 26 रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या कमी वाटत असली तरी राज्यात दोन नंबरवर पिंपरी-चिंचवड शहर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु असे असताना 26 रुग्णांपैकी 15 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.