मुंबई – एसटी कामगारांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या असून काही मागण्यांवर चर्चा सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.
एसटी महामंडळातील कामगारांच्या वेगवेगळ्या 21 संघटनांच्या कृती समितीसोबत सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली.
दरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला यासाठी मी अभिनंदन करतो. कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडलं”. महसुलात घट झाल्यानेच शरद पवार चर्चा करण्यास भाग पडले असा दावा त्यांनी फेसबूकवर व्हिडियो शेअर करत केला आहे.