अकोले – शाळा बंद पडल्या तर गावांची अधोगती होईल .शाळा बंद पडल्या तर आमच्या सारख्यांना गावात फिरू देऊ नका, शाळांचे कुठल्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही. प्राणाची बाजी लावावी लागली तरी चालेल, पण सरकारला शाळा बंद करू देणार नाही, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.
अकोले तालुका शाळा बचाव समितीतर्फे नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, राज्यातील हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बॅंक संचालक अमित भांगरे, माकप नेते डॉ. अजित नवले, रिपाईचे नेते विजय वाकचौरे, शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर, सागर शिंदे सहभागी झाले होते.
आ.डॉ. लहामटे म्हणाले की, शाळांचे खासगीकरण विरोधात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना भेटून निवेदन देणार आहे. विधानसभेत सुध्दा हा प्रश्न उपस्थित करणार आहे. देशात आणि राज्यात शिक्षणावर खर्च कमी होत असून तो वाढविला पाहिजे. यावेळी कवी मधुकर धांडे, विनय सावंत, अनिकेत घुले, विजय वाकचौरे, डॉ.अजित नवले, डॉ.संदीप काडलग आदींची भाषणे झाली.
दोन डॉक्टरांमध्ये कलगीतुरा
माकप नेते डॉ. अजित नवले म्हणाले की, कोणीही डबल ढोलकी वाजवू नये, अशी कोपरखळी लगावली. आ. डॉ. किरण लहामटे यांनी माझा काय डबल ढोलकी वाजविण्याचा धंदा नाही, 14 ला यावर नक्की बोलू… असे म्हणत त्यांनी ही अप्रत्यक्षपणे चिमटा घेण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही डॉक्टरांच्या या भाषणाची आज राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. तर नेते व्यासपीठ कुठलही असो एकमेकांना खेचण्याची संधी मात्र सोडत नाही. हे यावरून लक्षात आले.