दौंड – दौंडच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयास राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार ऍड. राहुल कुल यांनी दिली. पाटस (ता. दौंड) येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदर कुल बोलत होते.
आमदार कुल म्हणाले की, दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याची अधिसूचना शासकीय राजपत्राद्वारे शासनाने यापूर्वी दि. 18 सप्टेंबर 2019 रोजी काढली होती त्यावेळी सूचना व हरकती मागविण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब झाल्यामुळे हे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर पुन्हा शासनाकडे पाठपुरवा करून तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बैठका घेऊन, विधिमंडळाच्या वेगवेगळ्या अधिवेशनात ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरकती व सूचना मागविण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या त्यामध्ये केवळ एकच हरकत दाखल झाली होती. त्यावर कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला होता, असे त्यांनी नमूद केले.
दौंड तालुक्यासाठीचे हे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी मागील अनेक दिवस आमदार ऍड. राहुल कुल यांचे प्रयत्न सुरू होते; मात्र सत्तांतरामुळे या विषयाचे घोंगडे भिजत पडले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर हे काम मार्गी लागत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही आमदार ऍड कुल यांनी सांगितले.
आमदारांकडून आश्वासन पूर्ती
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले होते त्याची पूर्तता झाली असून, दौंड उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाची अंतिम अधिसूचना व पदनिर्मितीचा शासन निर्णय राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे आमदार कुल यांनी नमूद केले.
पाच पदे नव्याने निर्माण
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात उपविभागीय अधिकारी (प्रांत), लघुलेखक (निम्नश्रेणी), अव्वल कारकून, शिरस्तेदार, महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक) अशा एकूण पाच पदे नव्याने निर्माण करण्यात आली असून, सध्या अस्तित्वात असलेल्या तहसीलदार कार्यालयात काही कालावधीसाठी हे कार्यालय सुरू करण्यात येईल असे देखील आमदार ऍड. राहुल कुल यांनी सांगितले.