पिंपळे निलख – रहाटणी ते काळेवाडी फाटा “बीआरटीएस’ रस्त्यावरील पदपथाच्या बाजूला असलेले जुने वडाचे झाड मुळासकट उपटून काढण्यात आले आहे. या झाडाच्या बाजूला जुना पदपथ आहे. या पदपथाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने 20 वर्षे जुने असलेल्या झाडाचा बळी घेतला आहे. एकप्रकारे शहरातील नियोजनशून्य विकास निसर्गाच्या मुळावर बेतत असल्याचे हे चित्र आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याने असे कृत्य करण्याचे धाडस ठेकेदार करत आहेत. मागे देखील अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. परंतु महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने शहरातील झाडांची संख्या कमी होत चालली आहे. रहाटणी ते काळेवाडी जाणाऱ्या मुख्य “बीआरटीएस’ रस्त्याच्या बाजूला असलेल्या पदपथाचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने या वडाच्या झाडाचा अक्षरशः बळी घेतला आहे. जेसीबीद्वारे खोदकाम करत असताना मुळासकटच चुकीच्या पद्धतीने हे झाउ मुळासकट उपटून काढले आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडला.
या मार्गावर नागरिकांची कायम वर्दळ असते. परंतु ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न नेमता रस्त्याच्या कडेला असलेले झाड पाडले असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत. त्यानंतर पडलेल्या झाडाची कोणत्याही प्रकारची परवानगी व संबंधित विभागास सूचना न देता ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी त्या वृक्षाची छाटणी करून माती व इतर वाहतूक करणाऱ्या वाहनातून झाडाची विल्हेवाट लावली असल्याचे दिसून आले.
या वेळी ठेकेदाराचा प्रतिनिधी नागेश बाबर यांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. अशा प्रकारे पर्यावरणाची हानी करणाऱ्यांकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे साधत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने अशा बेजबाबदार व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून दंड वसूल करावा. एकीकडे महापालिका झाडे लावण्यासाठी आवाहन करते. तर दुसऱ्या बाजूला महापालिका अधिकारी अशा ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आज वीस वर्षे जुने व तेही वडाचे मोठे झाड तोडले आहे.
– शशिकांत निकाळजे, सी. आर. सामाजिक संघटना, पिंपरी चिंचवड.
काळेवाडी ते आळंदी रस्त्यावर नेहमीच वृक्ष व इतर गोष्टीची प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र, विकासकामासाठी जर वृक्ष तोडले असेल तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून माहिती घेतो
– सतीश पोरेड्डी, अधिकारी, काळेवाडी- आळंदी बीअरटीएस रस्ता.