वाघोली, दि.१२ (प्रतिनिधी); वाघोली तालुका हवेली येथे होत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाला नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली असून सोसायटी परिसरातील प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे.
वाघोली हद्दीत असणाऱ्या अनेक गृह प्रकल्पातील अमेनिटी स्पेसच्या जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्या आहेत. या जागांपैकी पुणे मनपाकडून मार्बल प्रिया सोसायटीच्या परिसरातील असणारी अमेनिटी स्पेस ची जागा पुणे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाकडून मार्बल प्रिया सोसायटीच्या परिसरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली असून या प्रकल्पाला नागरिकांनी विरोध दर्शवला असून नागरी वस्तीमध्ये हा प्रकल्प नको अशी मागणी वाघोली तालुका हवेली येथील मार्बल प्रिया, अल्फा होम, कमल बाग तसेच शिवरकर वस्ती आदी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचा प्रक्रिया प्रकल्प नागरी वस्तीमध्ये नको.या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला एअर फोर्सची देखील बंधने आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या प्रकल्पास तीव्र विरोध करण्यात येणार आहे.
– रामभाऊ दाभाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य