नवी दिल्ली : सध्या सोशलवर एक बॅनर व्हायरल होत आहे. या बॅनर मध्ये ‘अविवाहीत जोडप्यांना बागेत येण्याची परवानगी नाही’ असे लिहिण्यात आले आहे. यावरून सोशलवर सध्या महापालिकेच्या ‘तालिबानी’ आदेशावर नागरिकांचा आक्षेप घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बॅनर हैदराबाद महानगरपालिकेनं इंदिरा पार्कमध्ये लावले होते. हा पार्क ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या (GHMC) अंतर्गत येते. शहरातील ६८ एकर परिसरात फैलावलेल्या इंदिरा पार्कमध्ये अविवाहीत जोडप्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता.
मात्र या बॅनरचा फोटो सोशलवर व्हायरल होताच तरुणांकडून आणि सुजान नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. तालिबानी आदेश असल्याची टीकाही सर्व स्थरातून करण्यात आली. या बॅनरवरून हैदराबाद महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. या विरोधानंतर दोन दिवसांत आपला आदेश पालिकेने मागे घेतला. महानगर- पालिकेकडून आपली चूक मान्य करत हे बॅनर हटवण्यात आले. आपला हेतू चुकीचा नव्हता मात्र बॅनरवर चुकीचे शब्द वापरण्यात आल्याचं महापालिकेनं मान्य केलंय.