मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर स्थापीत व्हावे- संजय मंडलिक

खासदार संजय मंडलिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर: मुंबई हायकोर्टअंतर्गत आज तारखेला सुमारे 65 हजाराच्या आसपास प्रलंबीत दावे असून प्रलंबीत दाव्यांची सद्यपरिस्थिती पाहता दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्याचे मुंबई हायकोर्टपर्यंतचे अंतर हे 600 किमी ते 750 किमी इतके भरते. या जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका पक्षकारास मुंबई येथे जावयाचे झाल्यास एका तारखेकरीता प्रती व्यक्तीस सुमारे पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च होतो. जो सर्वसामान्य पक्षकारांना न परवडणारा असा असल्यामुळे कोल्हापूर येथे लवकरात लवकर सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार संजय मंडलिक यांनी केली.

दरम्यान, कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही यामागणीकरीता संसदेमध्ये व संसदेच्या बाहेर आवाज उठविला असल्याचा खासदार मंडलिक यांनी यावेळी उल्लेख करुन केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमुर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर येथेच सर्किट बेंच व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिला असल्याचे निदर्शनास आणून दिले.

तसेच, 19 जानेवारी, 2019 रोजी माननीय मुख्य न्यायमुर्ती यांचेकडे महाराष्ट्र शासनाने देखील कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे याकरीता निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोयीकरीता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे लवकरात लवकर सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.