महेश मोतेवार यांच्या “समृद्धी जीवन फुड’कडून फसवणूक प्रकरणाचा तपास
पुणे – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा सुमारे सव्वा किलोचा सोन्याचा हार जप्त केला आहे. हा हार समृध्दी जीवन फुडचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांनी 2013 मध्ये श्रींच्या मुर्तीस अर्पण केला होता.
समृध्दी फुडसने शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक करुन मोठा आर्थिक फायदा मिळवण्याचे आमिष दाखवून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रासह इतरही अनेक राज्यात मोतेवार यांच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत.सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनूसार, आम्ही मोठी किंमत असलेला सोन्याचा हार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व्यवस्थापनाकडून जप्त केला आहे. महेश मोतेवार यांनी केलेल्या गुन्ह्याच तपास सध्या सीआयडीची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
त्यांनी गुंतवणूदारांना फसवणूक मिळवलेल्या पैशाची कोठे कोठे गुंतवणूक केली आहे, हे तपासले जात आहे. याचा शोध सुरू असतानाच आम्हाला एक छायाचित्र सापडले, त्यामध्ये मोतेवार हे श्रींच्या मुर्तीस हार अर्पण करत असल्याचे दिसत होते. त्यानूसार हा हार जप्त करण्यात आला आहे. हा हार शेतकरी व इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून केला गेला आहे. सध्या महेश मोतेवार हे ओरिसा राज्यातील कारागृहात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सुर्यवंशी यांनी सांगितले की, सीआयडीने आमच्याशी संपर्क साधला होता.
मात्र, आमची सार्वजनीक ट्रस्ट असल्याने आम्ही त्यांना धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यांनी सह धर्मादाय आयुक्तांकडून ऑर्डर मिळवल्यानंतर सोमवारी हार त्यांना सुपूर्त करण्यात आला. हा हार सव्वा किलोच्या आसपास असून त्यांची किंमत 50 लाख इतकी आहे.