लडाखमध्ये 6 किमींपर्यंत घुसल्याचा स्थानिकांचा दावा
नवी दिल्ली- भारत आणि चीन दरम्यान असलेली सिमा रेषांवरूनची धुसफूस थांबण्याचे नाव नसून चीनी सैनिक सीमारेषा पार करुन भारतात सहा किमी आतमध्ये आल्याचा दावा लडाख येथील माजी खासदारांनी केला आहे.
सदर घटना 6 जुलै रोजीची असल्याचे बोलले जात आहे. चीनी सैनिक डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात घुसले होते. यावेळी भारतीय जमिनीवर चीनी झेंडे फडकावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे लडाखमधील काही लोक बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. याचवेळी चीनी सैंनिकांनी संबंधीत लोकांना वाढदिवस साजरा करण्यापासून रोखले. या संदर्भातील माहिती लडाखमधील माजी खासदाराने दिली. खासदाराने स्थानिक महिला सरपंचाने पाठवलेल्या फोटोच्या आधारे ही माहिती दिली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी खासदार रेगजिन यांनी सांगितले की, चीन नेहमीच भारतीय सीमारेषा पार करुन घुसखोरी करण्याचे धाडस करत असतो. याची भारतालाही माहिती आहे. पण यासंबंधी कोणीही आवाज उठवत नाही. प्रसारमाध्यमंदेखील काहीच बोलत नाही आणि भारत सरकार शांतता बाळगत आहे. तसेच त्यांनी यावेळी असा दावा केला की, या परिसरात तीन ते चार वेळा चीनी सैनिकांना पाहिले गेले आहे. पण भारताने यावर कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही.