बीजिंग – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज चीनच्या राजकारणामध्ये इतिहास रचला. सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक माओ त्सेतुंग यांच्यानंतर पक्षाचे सरचिटणीस आणि देशाचे अध्यक्ष ही महत्वाची पदे सलग तिसऱ्यांदा मिळवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. आता ही दोन्ही पदे शी जिनपिंग यांच्याकडे तहहयात कायम राहतील, अशी शक्यता आहे.
कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशन समाप्तीनंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी झालेल्या पक्षाच्या सरचिटणीसपदी 69 वर्षीय शी जिनपिंग यांची आणखीन पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस, देशाचे अध्यक्ष आणि चीनच्या सर्वशक्तीमान पीपल्स लिबरेशन आर्मीचे सर्वोच्च प्रमुख या तिन्ही पदांवर आता शी जिनपिंग असणार आहेत.
म्हणूनच चिनी आणि परदेशी प्रसार माध्यमांनी या घटनेचे वर्णन “शी युग’ असे केले आहे. शी यांचे तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याने अध्यक्षांच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेच्या निकषाची समाप्ती झाली आहे. या निकषाला आतापर्यंत केवळ माओ त्सेतुंग हेच अपवाद राहिले होते. शी जिनपिंग हे 2012 साली पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते. त्यांचा 10 वर्षांचा कार्यकाल यावर्षी समाप्त होतो आहे.
दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिलेल्या मध्यममार्गी ली केगियांग यांना पक्षाच्या मध्यवर्ती समितीतून काल सहज बाहेर काढले गेले होते. या 300 सदस्यांच्या मध्यवर्ती समितीने आज 25 जणांच्या पॉलिटब्युरोची आणि पॉलिटब्युरोने 7 जणांच्या स्थायी समितीची निवड केली. अपेक्षेप्रमाणे या तिन्ही समित्यांमध्ये आणि शेवटी सरचिटणीस म्हणून जिनपिंग यांची निवड होत गेली. पक्षाच्या घटनेत जिनपिंग यांनी सुचवलेले दोन बदलही लगेचच स्विकारण्यात आले. ली केगियांग यांना वगळल्यामुळे आता चीनमध्ये नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवीन केंद्रीय प्रसासक मंडळ नियुक्त केले जाईल.
हु जिंताओ यांना बाहेर काढल्याचा काही परिणाम नाही –
काल पक्षाच्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी माजी अध्यक्ष हु जिंताओ यांना दोन अधिकाऱ्यांनी बाहेर काढले होते. त्या घटनेचा पक्षाच्या अधिवेशनाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. हु जिंताओ यांच्याकडून शी जिनपिंग यांना विरोध होण्याच्या शक्यतेने त्यांना बाहेर घालवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र हु जिंताओ यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना विश्रांतीसाठी शेजारच्या कक्षामध्ये नेण्यात आल्याचे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.