गुवाहाटी -अरूणाचल प्रदेश सीमेलगत चीनच्या हालचाली सुरूच आहेत. त्या देशाकडून संबंधित भागात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले जात आहे. त्यामध्ये रस्ते, रेल्वे मार्ग आणि हवाई संपर्कासाठीच्या व्यवस्थांचा समावेश आहे.
भारतीय लष्कराच्या पूर्व कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर.पी.कलिता यांनी चीनी हालचालींची माहिती दिली. कुठल्याही स्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा आणि सैन्याच्या हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी चीन प्रयत्नशील आहे. ते दोन्ही उद्देश साध्य व्हावेत यासाठी चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) जवळ काही गावेही विकसित केली आहेत.
अर्थात, भारतीय लष्कर सीमेलगतच्या स्थितीवर सातत्याने देखरेख ठेऊन आहे. कुठल्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतही क्षमता आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहे. भारतीय लष्कर पूर्ण सज्ज आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सीमाभागांत सातत्याने चीनी कुरापती सुरू असतात. त्यांना आवर घालण्यासाठी भारतीय लष्कराकडून पूर्ण सज्जता आणि दक्षता बाळगली जाते.