-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
चीन त्याच्या लष्करी सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे.
चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जैविक चाचण्या या त्यांच्या सैनिकांवर केल्या आहेत. त्यामधून सुपर सोल्जर्स तयार केले जात असावेत, अशी माहिती अमेरिकेचे नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिली आहे. चीनने क्षमता वाढवण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीही केला होता. अनेक ऍथलिट स्पर्धेमध्ये क्षमता वाढवण्यासाठी अनेकदा हार्मोन्सची इंजेक्शने घेतात, स्टेरॉइडचे सेवन करतात जेणेकरून ठराविक काळापुरती त्यांची क्षमता वाढते. त्यामुळे जागितक विक्रम करण्यात त्यांना मदत होते.
“सुपर सोल्जर’ची संकल्पना विज्ञानकथा/कॉमिक्समधून विचारात घेतल्या आहेत. यामध्ये डीएनए किंवा जनुकीय रचनेमध्ये बदल करून मानवी क्षमता वाढू शकते. “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’प्रमाणेच शरीराचे भाग, स्वतःहूनच वाढणारे अवयव यासारख्या गोष्टी भविष्यात अस्तित्वात असू शकतील. मात्र, निसर्गाच्या विरोधात जाऊन मानवी शरीरामध्ये बदल करणे योग्य नाही, म्हणून शास्त्रज्ञ व समाज अशा संशोधनाला विरोध करतात.
चीन हे का करतो आहे?
म्हणजे जैविक संशोधनाचा वापर करून आपली शारीरिक क्षमता वाढवणे हे तात्पुरते असते किंवा काही काळापुरते मर्यादित असते. परंतु त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. मग चीन हे का करतो आहे?
अत्यंत उंच जागांवर चिनी सैनिकांची लढण्याची ताकद किंवा क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे त्या भागात असणारी सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी ते सुपर सोल्जरची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे सुपर सोल्जर्स रात्रीच्या वेळेला जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, त्यांची ताकद, दम, चपळता खूप वाढली असेल आणि सर्वसाधारण चिनी सैनिकांच्या तुलनेत अधिक वेळ सीमेवर ते चांगल्या पद्धतीने काम करून शत्रूचा पराभव करू शकतील.
चीनने जागतिक महासत्ता होण्यासाठी नैतिकतेचे पालन केलेले नाही. ज्या प्रकारे त्यांनी वुहानच्या प्रयोग शाळेमध्ये चिनी विषाणूची निर्मिती करून जगाचे कंबरडे मोडले आहे, तशाच प्रकारे मानव जातीवर जैविक संशोधन करून जगावर राज्य करण्याची त्यांची लालसा आहे, त्यामुळे जगाने या विषयावर फारच गांभीर्याने विचार केला पाहिजे.
जगाचे कायदे असे म्हणतात की आण्विक, जैविक किंवा रासायनिक संशोधन हे जर मानवजातीच्या विरोधात असेल तर ते केले जाऊ नये. याचाच चीनच्या विरोधात वापर करून त्यांनी अशा प्रकारचे संशोधन थांबवावे. चीन या दबावाला भीक घालेल का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. कारण अनेक आंतरराष्ट्रीय कायदे चीन पाळत नाही.
काही वर्षांपूर्वी चिनी खेळाडूंनी जगावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. त्याही वेळेला चिनी खेळाडू अचानक जागतिक दर्जाचे कसे होऊ लागले अशी शंका निर्माण झाली होतीच. त्याही वेळेला अंमली पदार्थ, संप्रेरकांची इंजेक्शन तसेच जैविक संशोधनातून आपली क्षमता वाढवली असावी. म्हणजे अशा गोष्टी आधीसुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या या क्षमतेवर लक्ष ठेवून ते नेमके काय करत आहेत, यावर जगाचे बारकाईने लक्ष असावे.
इतर देशांचे संशोधन
अमेरिकेच्या लष्कराकडूनही असामान्य सैनिक विकसित करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामध्ये दुखण्यावर मात करणे, टेलिपथी किंवा रोबोटिक्सचा विचार करून सैनिकांची परिणामकारकता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. अन्य देशांनीही अशा संशोधनांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही, मात्र संशोधन थांबले नाही. स्पोर्टस मेडिसिनमध्ये खेळाडूंची कामगिरी/क्षमता वाढवण्याकरता अविरत संशोधन केले जाते, मात्र नैतिकतेची हद्द ओलांडली जात नाही.
भारताने काय करावे?
भारताचा विचार करता, स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. चिनी करोना विषाणूविरोधातील लशीचे संशोधन केले जाते आहे. जगाने मान्य केलेल्या पद्धतीने भारतीय शास्त्रज्ञांनीही संशोधन सुरू करावे, जेणेकरून अशा प्रकारच्या जैविक धोक्यांना तोंड देण्यास भारत तयार राहू शकेल. जोपर्यंत चिनी सुपर सोल्जरचा प्रश्न आहे तर चीनवर बारीक लक्ष ठेवून गरज भासली तर जगाची मदत घेऊन चीनचे घातकी संशोधन थांबवण्याची गरज आहे. जगातील विविध कायद्यांचा वापर करून चीनला रोखण्याचा प्रयत्न केला जावा.
इस्रायलने अनेक वेळेला संशोधन करणाऱ्या संशोधकांवर किंवा संस्थांवरही हल्ले केले आहे. अशा प्रकारच्या कारवाया अमेरिका, इतर युरोपियन राष्ट्र चीनविरूद्ध करू शकतील का, यावरसुद्धा विचार करणे गरजेचे आहे. आपल्याकडे चीनच्या या संशोधनाला प्रत्युत्यर देण्यासाठी वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्या संशोधनाचा वेग वाढवला पाहिजे.