इस्लामाबाद – चीन-अफगाणिस्तान-पाकिस्तान त्रिपक्षीय परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेचा येथे तिसरा टप्पा उद्या (शनिवारी) होणार आहे. अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि तालिबानमधील शांततेच्या करारावर स्वाक्षऱ्या होणे बाकी असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. ही बैठक पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले.
चीनचे परराष्ट्रमंत्री- स्टेट कौन्सिलर वांग यी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी आपापल्या प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व करतील.
सर्वप्रथम ही चर्चा 2017 मध्ये बीजिंगमध्ये झाली होती, त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये काबुलमध्ये दुसरी बैठक झाली. राजकीय संबंध, अफगाणिस्तान शांतता प्रक्रिया, सुरक्षा सहकार्य आणि दहशतवादविरोधी उपायांवर या बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य बाहेर काढण्यासाठी तालिबानी अतिरेक्यांशी केलेल्या शांतता कराराला अंतिम रूप देत असतानाच यावर्षी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी, अमेरिकेचे समन्वयक झल्माय खलीलझाद तालिबानांशी पुढील चर्चेसाठी कतारला परतले आहेत.