बीजिंग – जगातील सर्वात साम्राज्यवादी देश म्हणून ओळख असलेल्या चीनची नेहमीच युद्धासाठी आणि लष्करी संघर्षासाठी तयारी असते. आता अमेरिका आणि तैवान या राष्ट्रांना धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात खतरनाक युद्धाची तयारी चीन करत आहे.
त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या युद्धामध्ये कोणत्याही पारंपरिक शस्त्रांचा किंवा अस्त्रांचा वापर केला जाणार नाही. तर शत्रू राष्ट्रातील लोकांच्या मेंदूवर ताबा घेऊन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोणत्याही प्रकारचे पारंपरिक युद्ध हे नेहमीच खर्चिक आणि वेळ खाऊ असते आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. अशा प्रकारच्या कोणत्या युद्धाला बाजूला सारून आता कमी खर्चात आणि कमी वेळ खाणाऱ्या युद्धासाठी चीनने हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमधील संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शत्रू राष्ट्रातील लोकांच्या इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवून हे युद्ध लढले जाणार आहे. शत्रूराष्ट्राचे राष्ट्रपती तेथील लष्कर प्रमुख महत्त्वाचे राजकीय नेते आणि सामान्य नागरिक यांच्या इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवून हे वेगळ्या प्रकारचे युद्ध लढण्याची चीनची इच्छा आहे.
ऑस्ट्रेलियन पॉलिसी स्टेट या संस्थेने चायना मिलिटरी वॉच या लेखामध्ये याबाबतची माहिती दिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आगामी कालावधीमध्ये मानव जातीसाठी नुकसानदायी ठरू शकेल असा इशारा यापूर्वीच अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. चीनच्या या प्रस्तावित खतरनाक युध्दाच्या निमित्ताने हा इशारा खरा होताना दिसत आहे.