ब्रुसेल्स – चीन म्हणजे जागतिक सुरक्षेला आव्हान आहे. जागतिक व्यवस्थेला अडचणीत आणण्याचे काम चीनकडून केले जात असल्याचे “नाटो’च्या नेत्यांनी आज जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनबाबत व्यक्त केलेल्या मताप्रमाणेच हे मत आहे.
“नाटो’च्या नेत्यांनी शिखर परिषदेमध्ये चीनचा उद्दामपणा, विस्तारवाद आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आव्हान देण्याची सवय यावर जोरदार टीका केली. चीनमधीत मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपद स्वीकारतानाच जागतिक समुदायाला सांघिक भूमिकेचे आवाहन केले आहे. त्याचाच पुनरुच्चार “नाटो’च्या परिषदेत करण्यात आला.
परिषदेला उपस्थित असलेल्या 30 देशांच्या प्रमुखांनी चीनला प्रतिस्पर्धी संबोधण्याचे टाळले. चीनच्या दबावाच्या राजकीय धोरणाबाबत या नेत्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि चुकीची माहिती पसरवण्याच्या धोरणांबाबतही आक्षेप घेतला गेला. आपली आंतरराष्ट्रीय वचनबद्धता कायम ठेवावी आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी चीनला केले.
लष्करी व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चीन नाटोच्या जवळ येत आहे, असा इशारा नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. पण मित्र देशांना चीनबरोबर नवीन शत युद्ध नको आहे, यावर त्यांनी भर दिला. चीन हा रशियाप्रमाणे काही क्षेत्रांमध्ये भागीदार असल्याने चीनबाबतच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले.
“जी-7′ परिषदेमध्ये बायडेन यांनी चीनमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत आक्षेप घेण्याचे आवाहन सदस्य देशांना केले होते. याबाबत “नाटो’ सदस्य देशांबरोबर झालेल्या चर्चेबाबत आपण समाधानी आहोत. मात्र, चीनबाबतच्या आक्षेपांना काही देशांचा विरोध असल्याचे बायडेन म्हणाले.