खळद (पुणे) – कुंभारवळण (ता. पुरंदर) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या महानेट फेज 2 या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी हा संवाद साधण्यात आला. पुणे जिल्ह्यातून कुंभारवळण या एकमेव गावाची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती.
मोफत इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून शितल खैरे-जाधव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर ऑनलाइन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
महानेटच्या माध्यमाने करोना संकटात ऑनलाइन शिक्षणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणातील अडसर दूर होऊन विद्यार्थ्यांचा दर्जा नक्कीच उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आणि महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत काही सूचना असतील तर त्या आम्हाला शिक्षकांनी नक्की कळवाव्यात, असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधण्यासाठी खैरे यांना शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी गटविकासाधिकारी अमर माने,गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, मंडल अधिकारी प्रभावती कोरे, आरोग्य विभाग प्रमुख बेलसर, शाळेचे सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.