पुणे – मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमधले मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात हे सांगा. असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे त्याभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनुष्यहानी सुद्धा झाली आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश, व्यथा प्रसामध्यमांच्या माध्यमातून दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मी व देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांचा मराठवाडा व विदर्भचा दौरा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरेकर म्हणाले की, ऐवढे दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली ऩाही. मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केली त्यावर दोन दिवसांत मदत केली जाणार असल्याचे वड्डेटीवार यांनी सांगितले आहे.
मात्र मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमधले मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात हे सांगा. आमची मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर पंचनामे करायचे तेव्हा करा पण आता तात्कालीक मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. कारण वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही. असे दरेकर यांनी सुनावले आहे.