मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना आज घडली. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांचे मुळ गाव “दरे’ येथे उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने परत फिरले.
मुंबईमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर साताऱ्याच्या दिशेने निघाले.
अखेर ते मुख्यमंत्री शिंदेंचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर उतरवण्यात आले.
मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे रवाना झाले. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर दरे गावात उतरण्यास समस्या झाली होती. मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी दरे या गावी पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री काही दिवस तिथे मुक्काम करणार असून या भागातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वत: बांबू लागवडही करतील.