चिदंबरम यांनी ऐकवली कोर्टाकडे कैफियत
नवी दिल्ली : आयएनएक्स मिडीया प्रकरणात कोणाच आर्थिक गैरव्यवहार आपण केलेला नाही किंवा या प्रकरणात आपण व्यक्तीगत लाभासाठी आपल्या अर्थमंत्रीपदाचा कोणताच दुरूपयोग केलेला नाही असा दावा अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. त्यांनी कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर आक्षेप घेणारे जे निवेदन सीबीआयने कोर्टापुढे केले आहे त्याला दिलेल्या उत्तरात त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.
त्यात चिदंबरम यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात कोणत्याहीं प्रकारच्या सार्वजनिक निधीचा वापर झालेला नाही, ही बॅंक फ्रॉडचीही केस नाही, किंवा देशाबाहेर पैसा नेण्यात आल्याचे हे प्रकरण नाही, किंवा गुंतवणुकदारांचे पैसे चोरण्यात आल्याचा हा प्रकार नाही. आपल्या विरोधात ठोस पुरावा असल्याचा सीबीआयचा दावाही खरा नाही. या व्यवहारात सरकारी निधीचा अपव्यय किंवा वापरही झालेला नाही त्यामुळे ही भ्रष्टाचार किंवा फ्रॉडची केसच ठरत नाही असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.
मात्र सीबीआयने त्यांच्यावर जोरदार आरोप करीत आयएनएक्स मिडीयाला विदेशी गुंतवणुकीला अनुमती देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा तसेच यातून त्यांनी व त्यांच्या मुलांनी पैसा मिळवल्याचा दावा केला आहे. चिदंबरम सध्या 3 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांनी 2007 साली आयएनएक्स मिडीया कंपनीला विदेशातून गुंतवणूक आणण्याचा प्रस्ताव संबंधीत बोर्डाच्या शिफारशीनंतर मंजुर केला होता.