भाजपच्या प्रचार व्हिडीओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप; काँग्रेसने घेतला आक्षेप

नवी दिल्ली : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकिकडे द्रमुक आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागत असतानाच एक घोळ झाल्याचे उघड झाले आहे. तामिळनाडू भाजपाने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या व्हिडीओमध्येच एक चूक झाली आहे. काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या नृत्याचीच क्लिप प्रचाराच्या व्हिडीओत समाविष्ट केली आहे. भाजपाच्या जाहीरनामा सांगणारा हा व्हिडीओ असून,या चुकीची तामिळनाडूत चांगलीच चर्चा रंगली आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तो व्हिडीओ स्वरूपातही तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तयार करत असताना तामिळनाडू भाजपाने त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची सून व कार्ती चिदंबरम यांची पत्नी स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लिपही घेतली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्या नृत्यांगनाही आहेत. स्त्रीनिधी यांच्या भरतनाट्यम करतानाच्या व्हिडीओतील काही भाग भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडीओत समाविष्ट केला आहे.

भाजपाच्या या चुकीवर तामिळनाडून काँग्रेसनं बोट ठेवलं असून, विनापरवानगी क्लिप वापरल्यावरून सुनावलही आहे. तामिळनाडू भाजपाला उद्देशून टीकाही केली आहे. “सहमती घेणं तुमच्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. पण, तुम्ही विनापरवानगी स्त्रीनिधी कार्ती चिदंबरम यांचा फोटो वापरू शकत नाही. यातून तुम्ही सिद्ध केलंय की तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली आहे,” अशी टीका तामिळनाडू काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे या चुकीवरून तामिळनाडू भाजपा आता नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या नृत्याची क्लिप समाविष्ट केल्यानं नेटकऱ्यांकडून भाजपाला ट्रोल केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे स्त्रीनिधी चिदंबरम यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून, हे सगळं हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.